प. प. श्री नारायणानंदतीर्थ स्वामी महाराज यांचा संक्षिप्त परिचय

सदगुरु नारायणानंदतीर्थ स्वामी महाराज यांचे वास्तव्य अखंड १८ वर्षे औदुंबरी झाले. यात काही वर्षे ब्रम्हानंद मठात वास्तव्य केले होते. महाराजांच्या शिष्य भक्तांनी त्यांना ध्यान धारणेसाठी गुहा असलेला आश्रम बांधून दिला. या आश्रमास महाराजांनी आपल्या दोन्ही सदगुरुंचे संयुक्त नाव 'श्री गुरु शिवशंकरानंद आश्रम' असे दिले. सुशिक्षित-अशिक्षित, श्रीमंत-गरीब, श्रेष्ठ-कनिष्ठ अशा सर्व तऱ्हेच्या लोकांना मार्गदर्शन करून त्यांनी उपासनेची प्रेरणा दिली. कड़क आचरण व दयाळू वृत्ति या प्राय: परस्पर विरोधी गुणांचा स्वामी महाराजांच्या ठिकाणी उत्कर्ष होता. त्यामुळे श्री दत्तगुरुच या रुपाने अवतरले आहेत अशी भाविकांची भावना झाल्यास आश्चर्य काय? संप्रदायशुध्द शास्त्रीय आचरणपूर्वक साधनेचे आदर्श स्वरुप म्हणजे श्री महाराजांचे चरित्र. जिज्ञासुंसाठी परिचय या दृष्टीने स्वामी महाराजांचे त्रोटक चरित्र देत आहे.

कर्णाटक प्रदेशात कारवार जिल्हयामध्ये सिर्सी नावाचा तालुका आहे. त्या तालुक्यातील शिगेहळिऴ या गावाजवळ ओणेकाई नावाची वाडी आहे. तेथे वे. भू. नरसिंहभट्ट उपाध्ये या नावाचे वसिष्ठ गोत्री सत्शील ब्राम्हण रहात असत. ते स्वतः विद्वान व तपस्वी होते. पौरोहित्य करून थोड़ी फार शेती करीत. भात व सुपारी हे शेतीतुन मिळणारे उत्पन्न. त्यांच्या पत्निचे नाव गंगा. अशा या पवित्र कुळात श्री महाराजांचा जन्म झाला.

‘शुचीनां श्रीमंतां गेहे योगभ्रष्टो ऽ भिजायते । ‘

नरसिंहभट्टांना एकूण अपत्य पाच झाली. त्यापैकी पहिली मुलगी भागीरथी. हिची मुलगी बालविधवा गंगाक्का औदुंबरी बरीच वर्षे श्रीगुरु सेवेस होत्या. चार मुलगे, क्रमाने तिमण्णा, राम, गोविंद, आणि नारायण या नावाचे होते. त्यापैकी तिमण्णा हे ज्येष्ठ असून तेच पुढे संन्यास घेवून औदुंबरी राहिले.

तिमण्णांचा जन्म शके १८०८ या वर्षी भाद्रपद शु. ५ (ऋषीपंचमी) रोजी झाला. बालपणापासून तिमण्णांना देवाचा नाद फार होता. बालपणी एके दिवशी एक विलक्षण आश्चर्यकारक प्रसंग घडला. आईची नजर चुकवून बाळानी देव्हाऱ्यातील देवीची मूर्ती हातात घेतली व अक्षरशः त्या मूर्तीबरोबर खेळत बसले, हा त्यांचा अजाणत्या वयातील खेळ!

वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रथम ज्यावेळी तिमण्णांचा हा खेळ आईच्या दृष्टीस पडला. त्या रागावल्या, तडक देवघरात जाऊन त्यांनी देवीची मूर्ती बाळाच्या हातातून काढून घेतली व ती तेथेच ठेवून बाळाला संतापाने ओढून बाहेर बसवले. परंतु देवीला बाळाची नाराजी सहन झाली नाही . ती मातोश्री सौ. गंगाबाईच्या स्वप्नात आली व दृष्टांत दिला.

” हा असे माझा बाळ । सान लाडका लडिवाळ ।
करी याचा तू सांभाळ । यासी कधी दुखवू नको ॥”

यामुळे अगदी बालपणापासूनच अवती-भोवतीच्या लोकांना तिमण्णाबद्दल आदर वाटू लागला. तिमण्णा देवतांचा प्रसाद आहे अशी त्यांची भावना झाली.

वयाच्या आठव्या वर्षी तिमण्णांचे उपनयन झाले.  आपल्या या प्रासादिक मुलाचे अध्ययन चांगले व्हावे म्हणून वे.  नरसिंहभट्टांनी गोकर्ण क्षेत्रात त्यांची अध्ययनाची सोय केली.  तेथे गायत्री तिमण्णाभट्ट या नावाचे विद्वान वैदिक होते.  त्यांचेकडे तिमण्णांचे वेदाध्ययन सुरु झाले.  वे. नरसिंहभट्टहि गोकर्णीच राहू लागले.

यानंतर दोन वर्षांनीच नरसिंहभट्टांचे प्राणोत्क्रमण झाले.  तिमण्णांचे अध्ययन चालूच राहिले.  सांग कृष्ण यजुर्वेदाचे अध्ययन गुरु गायत्री तिमण्णाभट्ट यांचेकडे झाले.  त्याचबरोबर संस्कृत भाषेचीही व्युत्पत्ती झाली. धर्मशास्त्र, पुराण ज्योतिष, मंत्रशास्त्र या विषयांचाही त्यांचा चांगला अभ्यास झाला होता. त्यासमयीच गोकर्णक्षेत्रीय माणकेश्वर मंदिरात दक्षिणामूर्ती मंत्राचा २४ लाख जप करून अनुग्रह मिळाला. वयाच्या १८ व्या वर्षी एवढे अध्ययन पुरे करून तिमण्णाभट्ट घरी परतले.

त्यावेळी शिगेहळिऴस तिमण्णा उपाध्ये या नावाचेच दुसरे एक योगी रहात होते.  हेच पुढे श्री शिवानंद सरस्वती या नावाने प्रसिध्द झाले.  तिमण्णाभट्टांवर (ओणेकैतील)  उपासनेचे प्रभावी संस्कार होण्यास सर्वस्वी श्री शिवानंदच कारणीभूत असल्यामुळे त्यांचा त्रोटक परिचय करून घेणे उचित होईल.

प. प. श्री शिवानंद सरस्वती – (शिगेहळिऴ)

गोकर्णाजवळ नवलगोण या नावाचे एक गांव आहे. तेथील हे पुरोहित. जन्मतःच सिद्ध असावेत अशी बालपणापासून यांची वागणूक होती.  त्यांच्यासंबंधीची एक अशी कथा प्रसिद्ध आहे,  त्यावेळी हे पाच वर्षाचे होते.  घरासभोवार नारळ,  सुपारी यांची बाग व हेच उत्पन्न.  एकदा काही कारणामुळे चांगल्या नारळांनी बहरलेले एक झाड पडले. काही दिवसांनी त्या नारळाचे उत्पन्न पुष्कळ झाले असते, म्हणून त्यांची आई शोक करू लागली.  शिवानंद त्यावेळी तिच्याजवळ होते.  शिवानंदानी हाताच्या बोटाच्या खुणेने ते झाड पुन्हा पूर्ववत उभे केले.

उपनयनानंतर योग्यवेळी त्यांचा विवाहहि झाला.  तसेच उत्कट वैराग्यामुळे घरातून बाहेर पडून योग्य साधन करून मोठे योगाभ्यासी झाले.  २४ वर्षे न झोपता एकाच आसनावर कठोर तपाचरण केले. त्यानंतर श्री दत्तगुरुंशी प्रत्यक्ष संभाषण झाले. तेव्हा ओणेकैचे तिमण्णा भट्टांकडून संन्यास घेण्यास सांगितले त्यावेळीच शिवानंदानी माझे सारखेच दर्शन देवून तिमण्णाभट्टांना मुक्ती मिळावी असे दत्तगुरूंचे जवळ सांगितले आहे.  तसेच पुढे घडले व तिमण्णांचे कडून त्यांनी सर्व संन्यास विधी स्विकारला व त्यांना शिवानंद सरस्वती हे नाव दत्तमहाराजांनी ठेवले.

तसेच संन्यास दिक्षा घेतल्यानंतर भिक्षेसाठी एकाचे घरी गेले वेळी रात्रीसमय झाला होता.  तेथे लहान गाव असल्यामुळे त्यांना देणेसाठी दुध नव्हते.  परंतु एक वांझ म्हैस होती.  महाराजांनी त्यांची मनःस्थिती जाणून वांझ म्हैसीचे दुध काढून मला आणा असे सांगितले बरोबर विश्वासाने यजमानाने वांझ म्हैसीचे अधिक दुध काढले व त्यांना आणून दिले.

योग्यवेळी तिमण्णाभट्टांचे ओणेकैच्या घरापासून ३ मैल अंतरावरील एका गावातील यमुना नावाच्या मुलीशी लग्न झाले. तरी सुध्दा तपश्चर्येची उत्कट इच्छा असलेमुळे वर्षातून काही महिने तपश्चर्येसाठी पवित्र क्षेत्रस्थानी जाऊन तपश्चर्या करीत असत. शिवानंदांचे मार्गदर्शनाप्रमाणे त्यांचा गृहस्थाश्रम सुरु झाला. दत्तगुरूंचे आज्ञेप्रमाणे शिवानंदांनी त्यांना अग्निहोत्र घेण्यास सांगितले. एवढ्या लहान वयात विधीपूर्वक अग्निहोत्र स्वीकारले.

अग्नी हे देवाचे मुख आहे. अग्निहोत्रामुळे सर्व सृष्टीचे पोषण होते असे अग्निहोत्र श्रेष्ठ कर्म आहे. सकाळ/संध्याकाळ होम होत. पौर्णिमा अमावस्या या दिवशी विशिष्ट होम वगैरे सर्व यथास्थित सुरु झाले. त्यावेळी यांना कौटुंबिक यज्ञदेवता कृत्य, अन्नादानादी धार्मिक समारंभ मोठ्या प्रमाणात ते करू शकले.

ह्यांनी अग्निहोत्र घेतल्यानंतर दोन वर्षांनी सोमयाग नावाचा यज्ञ केला. या यागाची दीक्षा घेतल्यानंतर तिमण्णा दीक्षित नावाने प्रसिध्द झाले. तसेच चातुर्मास्य याग, नक्षत्र याग वगैरे इतर यज्ञही केले. यज्ञाचा खर्च मोठा असतो, तथापि भाविक लोकांच्या सहाय्यामुळे व घरच्या लोकांच्या अनुकूलतेमुळे कार्यक्रम व्यवस्थित झाले. सोमयाग हा यज्ञ केलेनंतर त्यांची मातोश्री दिवंगत झाली.

दीक्षितांच्या घरात तळघर होते. फावल्या वेळेत ते जपानुष्ठान करित. त्यांच्या घरापासून १ फर्लांग अंतरावर तळ्याजवळ गुरूंचे आज्ञेप्रमाणे एक गुहा बांधून घेतली. तेथे साधना अधिक प्रमाणात सुरु झाली. ह्यांचे कुलदैवत देवी, अश्विनातील नवरात्री उत्सवात वेद, पारायण, पुराण प्रवचन, अन्नदान मोठ्या प्रमाणात होत असे. त्यांच्या वयाच्या ३० च्या पुढे घराला लागुनच एक मंदिर बांधून दत्तपादूकांची आपले सदगुरू शिवानंदाचे हस्ते स्थापना केली, नंतर देवी – दत्तोपासना सुरु झाली.

दिक्षितांचा परंपरागत व्यवसाय पौरोहित्य हा होता.  पौरोहित्याचे काम यथाशास्त्र होत असे.  पुरोहित श्री. दीक्षित स्वतः तपस्वी असलेमुळे केलेले अनुष्ठान निश्चित फलदायी होई. त्यामुळे लोकांची त्यांचेवर अपार श्रद्धा बसली.  सांसारिक अडचणीने त्रस्त झालेले खूप लोक मार्गदर्शनासाठी त्यांचेकडे येत.  स्वाभाविकपणे दयाळूवृत्ती असलेमुळे लोकांना त्यांचा चांगला आधार वाटत असे.  काही कामना पूर्ण होण्यासाठी एखादे अनुष्ठान करून जर फलप्राप्ती झाली नाही तर ते फळ मिळेपर्यंत श्री दीक्षित अनुष्ठान करीत असत.  यामुळे दीक्षितांनी अनुष्ठान मान्य केले म्हणजे कार्यसिद्धी झाली हे ठरल्यासारखेच होते. कर्म मार्गा वरील अशी श्रद्धा व निष्ठा अत्यंत दुर्मिळ होय.

पहाटे ब्राह्म मुहूर्तावर उठून योगाभ्यास करीत. संधीप्रकाश पाहिल्यानंतर स्नान संध्या करून अग्निहोत्र ,होम, देवपूजा हे विधी क्रमाने उरकून गृहामध्ये बसत. तेथे माध्यान्न पर्यंत जप करीत बसत. नंतर वैश्वदेव नैवेद्य करून भोजन होई. दुपारी ग्रंथावलोकन तत्वचिंतन, पुराण, आलेल्या लोकांच्या प्रश्नांचे ज्योतिष शाश्त्राधारे प्रश्नोत्तर असा कार्यक्रम होत असे.

संध्याकाळी स्नान संध्या, होम, आरती करून रात्री फराळ झाल्यावर १० ते ११ पर्यंत जप वगैरे होई. याप्रमाणे त्यांची दिनचर्या ऋषितुल्य होती.तसेच काही महिने गोमुत्रान्न स्वीकारून नंतर वानप्रस्थाश्रमाप्रमाणे साळी, केळी, दुध यावरून दिनचर्या चाललेली होती.

शिवानंदस्वामी प्रमाणे सुप्रसिध्द भगवान श्रीधर स्वामी हे योगाभ्यास करिता शिवानंद स्वामींचे कडे आले होते.  ते दीक्षित स्वामी यांचे गुरु बंधू होते.  यांनी सुद्धा दीक्षित स्वामी यांचेकडून संन्यास ग्रहण केला.

तसेच  ४/५  जणांनाही  दृष्टांताप्रमाणे ह्यांचेकडून संन्यास मिळाला असे कळते.

यावरून यांचे तपश्चर्येचे महत्व सहज लक्षात येईल.

विप्रा गावश्च वेदाश्च तप: सत्यं दम: शम:।
श्रद्धा दया तितिक्षाच क्रतवश्च हरेस्तनू: ॥

भागवत – १०/४/४१ या श्लोकात सांगितलेल्या ईश्वरी विभूतींची छाया श्री. दिक्षितांचेवर पूर्ण होती. अर्थात त्यांचे जिवन यज्ञमय, विष्णुमय झाले होते.

यथाविधी आचार धर्म उपासनेचे फळ चित्त शुद्धी होवून,  ईश्वरी अनुग्रह मिळावा यासाठी त्यांची साधना चालू होती, त्यातील महत्वाचा भाग वैराग्य, प्रापंचिक विषयांचा वीट त्यांना क्रमप्राप्तच झाला. त्यावेळी ह्यांचे वय सुमारे ५० वर्षांचे होते, त्या सुमारास शिवानंद स्वामींचे शरीर अस्वस्थ असताना नेमाप्रमाणे त्यांचे दर्शन घेतले.  त्यांची अशी आज्ञा झाली की पुढे संन्यास घेवून परंपरा रक्षण करावी.  असा उपदेश करून,  त्यांचे अपरोक्ष ते योग समाधीस्त  झाले.  संन्यासासाठी  महावाक्योपदेश, त्यांचेकडून व्हावा अशी इच्छा होती. परंतु, विपरीत घडल्यामुळे काही दिवस उदासीन होते.  परंतु आहार,  विहार हे सर्व संन्यासाश्रमाप्रमाणे करत होते.  पूर्वीप्रमाणे दत्तक्षेत्री सत्संगती अधिक घडावी ह्या दृष्टीकोनातून अशा क्षेत्रावर संचार करत होते.  असे संचार असताना शृंगेरीस शंकराचार्य श्री.  चंद्रशेखर भारती स्वामी महाराज यांचे दर्शनासाठी तेथे गेले.  त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी समाधी अवस्थेत असत.  ह्यावेळी ह्यांना पाहिलेबरोबर,  तुम्हास पुनर्जन्म नाही असे अमृतमय वाक्य ऐकून मोठा दिलासा वाटला. ह्यावेळी ह्यांची भाची गंगाक्का ह्यांचेबरोबर सेवेला होती.  तिला ते ईश्वरसेवा अध्यात्म यांचे मार्गदर्शन करत असत.

श्री दीक्षितांच्या इच्छेनुसार संन्यास घेणेसाठी, घरातील वातावरण वैराग्य पोषक झाले होते.  ६० व्या वर्षी अशी घटना घडली शिवरात्रीच्या दिवशी दत्तमंदिरात रात्रभर याम पूजा करून घरात गेले.  ते पुन्हा स्नानादी नित्यक्रम उरकून पुजेसाठी मंदिरात आले. तो दत्तमूर्ती दिसेना, अत्यंत चिंतातूर झाले. गावच्या तलावात मूर्ती टाकली आहे असे समजल्यावर, शोधा शोध झाली परंतु व्यर्थ, शंकराचार्यांनी म्हटलेप्रमाणे –
‘निजगृहाततूर्णम् विनिर्गम्यताम् ‘ असे मुमुक्षांना उद्धेशून म्हटले आहे. मोक्षेच्छा असलेली,  ह्यांची संन्यास घेण्याची तयारी झाली.परंतु धर्मपत्नीची संमत्ती नव्हती अशाप्रसंगी ” गुरुरावेदयेतत्त्वमत् आदौ गुरूं श्रयेत” (त्रिपुरा र. ज्ञा. १६/११)

तत्वज्ञानासाठी प्रथम गुरूंचा आश्रय करावा.  असे गुरु वाक्य श्रेष्ठ समजून तसेच शिवानंदांचे स्वप्न दर्शनाप्रमाणे दीक्षितांनी गंगाक्का समवेत शके १८७३ श्रावण महिन्यात गोकर्णी जातो असे सांगून गोकर्णातून कृष्णातीरी औदुंबरी येवून ब्रम्हानंद मठात वास्तव्य केले.  पूर्वी अग्निहोत्र असताना तेथे वास्तव्य केले होते.  श्री दत्तगुरूंचे आदेशाप्रमाणे अग्निहोत्री दीक्षित यांनी शके १८७३ श्रावण शु.  ५ (पंचमी) रोजी संन्यास ग्रहण केला.

प. पू. स्वामी शंकरानंद उर्फ अवधूत स्वामी (दंडदाते गुरु )

प.पू. अवधूत स्वामींची योग्यता फार मोठी असून, ते नित्य ब्रम्ह चिंतनात निमग्न असत.  यांचा मुक्काम नर्मदा किनारी व्यास बेट येथे होता. तेथे दीक्षित स्वामींनी १ महिना त्यांचेजवळ राहून दंड ग्रहण स्वीकारून ते नारायणानंदतीर्थ असे तीर्थ संप्रदायी झाले.  तेथून वैशाख महिन्यात औदुंबरी पूर्वीप्रमाणे ब्रम्हानंद मठात रहाणे सुरु झाले.  काही दिवसांनी शिष्य भक्तांनी बांधलेल्या आश्रमात गुहेमध्ये ध्यान धारणा करीत येथेच वास्तव्य केले. हाच सध्याचा श्री गुरु शिवशंकरानंद आश्रम.

संन्यास ग्रहण केल्यानंतर,  संन्यासाश्रमाप्रमाणे आचरण सुरु झाले.  दत्त दर्शनाला आलेले लोक महाराजांच्याकडे दर्शनाला येत असत.  ज्योतिषशास्त्र व मंत्रशास्त्र यात तर ते सिद्धहस्त असल्यामुळे तापत्रय पिडीत जनांना योग्य मार्ग दर्शन मिळत असे.  तसेच त्यांनी सांगितले प्रमाणे मनोरथ पूर्ण होत असे. त्यांचे नेहमीचे वाक्य त्यांचे मुखातून ऐकायला मिळायचे.

संतोषम् जनयेत् प्राज्ञ: । तदेवेश्वर पूजनम् ॥

संसारामध्ये संतप्त झालेल्या लोकांना अधिकाराप्रमाणे विविध रूपाने मार्गदर्शन करून सुख देणे ही ईश्वराची महापूजा असा ह्या वाक्याचा अर्थ येथे पहावयास मिळतो.

महाराज पहाटे ३ ते ४ या ब्राह्य मुहूर्तावर उठत.  कृष्णा नदीत त्रिकाळ स्नान करीत.  सर्व अनुष्ठान मठातील गुहेत करीत.  दुपारी २ नंतर फलाआहार घेवून दर्शनार्थी लोकांना ५-३० पर्यंत उपासनेचे मार्गदर्शन  करीत  असत.  नंतर  संध्याकाळचे स्नान झालेबरोबर रात्री,  पूजा आरती नंतर एक ते दीड पर्यंत ध्यानधारणा करीत असत.  असा त्यांचा दिनक्रम चालू होता.  त्यानंतर काही वर्षात तेथे मठात दत्तमंदिर स्थापन केले.

या प्रमाणे चारी आश्रम यथाविधी आचरून दीनजनांवर अनुग्रह करणारा देह ८३ वर्षाचा झाला होता. ई. स. १९६७ साली दत्तजयंती दिवशी दत्तमूर्ती स्थापना केली.  त्यापूर्वी माझे पूजन येथेच आहे असे वाक्य हसत मुखाने सांगितले.  ह्या वाक्याचा अर्थ कोणाला समजला नाही.  त्यानंतर माघ शु.  १५ पौर्णिमे दिवशी प्रसाद दिला.  गुरुप्रतिपदा आली का?  असे सर्वांना विचारले.  माझा जप संपला असे म्हणून हातातील माला पूज्य गंगाक्कांना दिली.  प्रणवपूर्वक नामोच्चारण करीत महाराज समाधिस्थ झाले. त्यावेळी माघ व. १ होती. हीच गुरुप्रतिपदा, ह्या दिवशीच दत्तावतारी नृसिंहसरस्वतींचा निर्वाण दिवस. यादिवशी सर्व दत्तक्षेत्री यात्रा भरत असते. त्यांनी बांधलेल्या दत्तमंदिरासमोर महाराजांचे समाधि मंदिर बांधिले.

श्री गुरुचरणारविंदार्पण मस्तु.

स्वामी महाराज यांचे संक्षिप्त महात्म्य

श्री महाराजांच्या अगाध लीला

श्री महाराजांचे मंगलमय संदेश

श्री स्वामी महाराजांचे बोधामृत

छायाचित्र दालन

श्री क्षेत्र औदुंबर
श्री गुरु शिवशंकरानंद – दत्त मंदिर
आदिशक्ति भुवनेश्वरी मातेचे मंदिर
दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी
श्री ब्रम्हानंद मठ