श्री क्षेत्र औदुंबर दर्शन

।। औदुंबराख्यं जगति प्रसिद्धं श्रीसदगुरॊः स्थान मतीव रम्यं
यस्योपकंठेच सरिद्वरा सा विराजते नित्य मनल्पतोया ।।

असे प्रख्यात दत्तक्षेत्र औदुंबर …… !

“काठावर घाटावर मंगल चारीहि प्रहर
शुभवारे, शुभ सारे अणू अणू इथला शुभंकर “

असे सुंदर, रमणीय, पवित्र पुण्यक्षेत्र औदुंबर…..

श्री दत्तावतार नरसिंह सरस्वतींचे हे स्थान.  त्यांच्या दर्शनाने चित्तवृत्ती बहरतात.  अंतःकरण प्रसन्न होते. प्रापंचिक चिंता, दुःखे यांचा अविलंबे परिहार होतो.

औदुंबरी प्रवेश करता सारा निसर्गच जणू ‘सुस्वागतम्’, ‘सुस्वागतम्’ म्हणत असतो. समोरच दिसणारा विशाल वटवृक्ष आपले प्रेमळ बाहू पसरून अभ्यागतांचे स्वागत करतो.  पक्षीगण मंजुळ स्वरानी जणू स्वागत गीतेच गात असतात.  वटवृक्षाच्या छायेत क्षणभर स्थिरावले की उजव्या बाजूस दिसतो  –  कृ ष्णेचा अथांग प्रवाह व घनदाट झाडी. तिकडे मग सहजच पावले वळतात. सुबकशा घाटावरून खाली उतरावे, हातपाय धुवावे,  कृष्णामातेचे दर्शन घ्यावे व समोर पैलतीरावर दॄष्टी टाकावी  –  तो दिसते दाट झाडीतून वर डोकावणारे उंच शिखर.  ते आदिशक्ति भुवनेश्वरीचे प्राचीन मंदिर आहे.  तिकडे जाण्यायेण्यासाठी अवधूत नौका खेपा करीत असते.  घाट चढून वर यावे की डाव्या हातास भव्य सभामंडप दिसतो.  त्याचे मागे औदुंबर वृक्षाचे कुशीत श्रीदत्तावतार नरसिंह सरस्वतींचे पादुका मंदिर विसावले आहे.  हेच औदुंबरक्षेत्राचे मुख्य स्थान .

याच विमल पादुकांच्या दर्शनाने स्वामी मोहरले,  त्यांना साक्षात दत्तात्रेय भेटले.  श्री एकनाथ महाराजांनाही येथे श्रीदत्तदर्शन झाले.  प. प. टेंबे स्वामींचा आनंद तर गगनात मावेना.  श्रीसंत रामदास पंचायतनातील सर्व संतानाही औदुंबरी परमानंद लाभला.  अनेक साधू सत्पुरूषांचे,  संतमहंतांचे हेच श्रद्धास्थान.  गुरु पादुकांचे दर्शन घेऊन प्रदक्षिणेला लागले की भोवती दिसतात सुबकशा ओवऱ्या.  यातून कुणी श्रीगुरुचरित्र वाचतात.  कुणी जप करतात, कुणाची योगसाधना चालते, तर कुणी ध्यानात रंगलेले असतात.

प्रदक्षिणा संपवून श्रीगुरूंचा तीर्थ अंगारा घ्यावा. घटकाभर मंडळात स्थिर व्हावे. देहभान विसरून जाते. वृत्ती स्थिरावतात…… “विकार नव्हते, विचार नव्हते, नव्हती वृत्ती कुठल्याठायी” अशी स्थिती होते.

पुन्हा श्री नरसिंहसरस्वतींचे विमलचरण उरी साठवून पायऱ्या चढून वर यावे तर पारंब्याशी जटा सोडून तप करीत बसलेल्या वटवृक्षरुपी ऋषींचे दर्शन होते.

या परिसरात……

“खालुनी वाहते करुणा परमेशाची
अन् तीरावरती वसली माय जगाची
वटवृक्षावरी सोडून जटा भूमीस
प्राचीन बसे जणू मूर्ती योगीशाची”

हे वर्णन किती यथायोग्य वाटते…..!

मग उजव्या बाजूस छोटीशी वाट गेलेली दिसते. तेथे पाटी आहे. ‘श्री गुरु शिवशंकरानंद आश्रमाकडे’ त्या वाटेने जाताना प्रथमच लागते श्री गुरु शिवशंकरानंद आश्रमची भव्य वास्तू,  हेच श्री नारायणानंदतीर्थ या श्री दत्त योग्याचे तपस्थान,  त्यांची समाधी व त्यांचे गुरु श्री शिवानंद व श्री शंकरानंद यांचे दत्तमंदिर अशी येथे समोरासमोर आहेत.

या आश्रमातून बाहेर पडताच डाव्या हातास अशीच एक छोटी वाट पुढे जाते.  तेथे उंचावर दिसतो ‘श्री ब्रम्हानंद मठ’ ब्रम्हानंद नावाचे एक महान दत्तभक्त योगी या मठात तप करीत होते.  पूर्वी ते गिरनार येथे तपश्रर्या करीत असतानाच दत्तात्रेयांनी त्यांना दॄष्टांत देऊन येथे कृष्णातिरी बोलावून घेतले.  दोन प्रचंड अश्वत्थ वृक्ष जयविजयासारखे या स्थानाची शान वाढवीत आहेत.  परत औदुंबरात आले की दिसतात,  छोटी छोटी पण सुबक अशी हारीने उभी असलेली येथील देवस्थानच्या पुजाऱ्यांची घरे,  देवाची फुलबाग, बापट धर्मशाळा, सुधांशू सदन, श्रीब्रम्हानंद समाधी, एस. टी. स्टँड, देवघर, शालागृह व पोस्ट ऑफिस.

असे हे छोट्या पण सुबक औदुंबर क्षेत्राचे मनोहर दर्शन.

छायाचित्र दालन

श्री क्षेत्र औदुंबर
श्री गुरु शिवशंकरानंद – दत्त मंदिर
आदिशक्ति भुवनेश्वरी मातेचे मंदिर
दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी
श्री ब्रम्हानंद मठ