श्रीदत्तावतार

” अनसुयेचे सत्व आगळॆ तिन्ही देवही झाली बाळॆ
त्रैमूर्ती अवतार मनोहर दिनोध्दारक त्रिभुवनी गाजे दत्त दिगंबर दैवत माझॆ”

असा हा अत्रि – अनसूया यांच्या तपोबलाने झालॆला – ब्रम्हा – विष्णू – महेशांचा अवतार – श्री दत्तात्रेय , त्रैलोक्य क्षितिजावर साक्षात ज्ञान गभस्तीच प्रगटला, विश्वाला सदगुरू लाभला .

हा गुरूंचा गुरु, वैराग्याचा महामेरू, साधकांचा कल्पतरू, जडजीवांचा- आधारू – तारू , दत्तात्रेयांनी साऱ्या त्रिभुवनात संचार करून चराचरावर करुणेचा वर्षाव केला .

” पायी खडावा , कटी लंगोटी व्याघ्रचर्म पांघरिले पाठी
गिरिशिखरी व सरिता काठी सतत समाधी भोगी ! “

असा हा कलंदर जोगी – ज्ञानेश्वरांनी ” पैल मेरूच्या शिखरी |
एक योगी निराकारी | मुद्रा लावून खेचरी | प्राणायामी बैसला | “
असे याच दत्तात्रयाचे वर्णन केले आहे.

असा हा दत्तात्रेयांचा महान अलौकिक अवतार !
श्री दत्तात्रेयांनी – अलीकडे कलियुगात – दोन अवतार घेतले .
पहिला आंध्र प्रांतात – पिठापूर ग्रामी – श्रीपादवल्लभ नावाने .

दुसरा विदर्भात करंजेग्रामी नरहरी (  नरसिंहसरस्वती  )  नावाने –  शिवव्रती ब्राम्हण माधव आणि त्याची पत्नी शिवव्रती अंबा यांच्या उदरी हा अलौकिक अवतार झाला .

” जन्मुनी अंबा माधव घरी | दत्त तो संन्यासाश्रम वरी || “
या मुलाचे काही दैवी चमत्कार बालपणापासून दिसू लागले होते.
याच्या स्पर्शे आरोग्य लाभे | लोहा लाभे सुवर्णता ||

अशा अनेक अलौकिक गोष्टी घडत होत्या .

सुयोग्यवेळी नरहरीचे मौजीबंधन झाले आणि आश्चर्य घडले . मातृभिक्षा होताच – हा बाल ब्रह्मचारी वेद म्हणू लागला .

” लागे ज्ञान प्रभा पसरू | अज्ञान तिमिर लागे विरू |
नाना शास्त्रांचे भांडारू | खुलू लागे द्विजगृही | “

अंबा माधव गृही असे कौतुक फुलत असता,  आनंदाचा सुगंध दरवळत असता एक दिवस या अलौकिक बाळाने-माता पित्यांचेकडे तपास जाण्याची अनुज्ञा मागितली. माता-पिता खिन्न झाले पण नरहरीने आपल्या प्रौढ पण मधुर सदुपदेशाने त्यांचे सांत्वन केले.  हा अवतारी पुत्र आहे-हे त्यांनी ओळखलेच होते.  त्यांनी त्याला आडविले नाही . माय पित्यांना वंदन करून हा बालब्रह्मचारी नरहरी गंगातीरी काशीस गेला. तेथे वृद्ध कृष्णसरस्वतींच्याकडून त्याने संन्यासदीक्षा घेतली.  नाम घेतले-‘ नरसिंहसरस्वती .’

नरसिंहसरस्वतींचा कीर्तीसौरभ चहूकडे दरवळू लागला.

“बालयोगी दैदिप्यमान | सकला करी सन्मार्ग दर्शन |
नाना परी संबोधी ज्ञान | जिज्ञासूंना तोपवी ||
सकल संन्यासी याते मानिती |जगदगुरू हा ऐसे वदती |
जैसा महा तेजस्वी गभस्ती | तैसा शोभे गुरुवर || “

असा काही दिवस काशीवास करून त्यांनी भरत खंडातील सर्व तीर्थ यात्रा केल्या . नंतर संचार थांबवून एखाद्या पवित्र एकांत स्थानी काही दिवस वास्तव्य करावे असे त्यांनी ठरविले. आणि त्यांच्या ध्यानी आले कृष्णाकाठचे निसर्गरम्य , शांत औदुंबर स्थान.

भिल्लवडी ग्रामा सन्निध | कृष्णा वाहे मंद मंद |
भुवनेश्वरी पुण्यप्रद | पुर्वतीरी विराजे ||
आणि कृष्णा प्रवाहात | सिद्धनाथ ते प्रख्यात |
येथे कृष्णा असे तीर्थ | निवारीत पातके ||
निवांत स्थळ पश्चिमतीरासी | अंकलखोप संन्निधेसी |
औदुंबर वृक्ष छायेसी | साक्षात् शांती नांदतसे |

अशा या औदुंबर स्थानी येऊन श्रीनरसिंह सरस्वती गुप्तपणे राहिले.  चातुर्मास भर त्यांनी येथे तपश्चर्या केली.  येथील श्रीगुरूंचा गुप्तावास प्रगट केला तो श्री भुवनेश्वरी मातेनी.-भुवनेश्वरी म्हणजे साक्षात आदिशक्ती पार्वतीच.  या कृष्णेच्या परिसरात महिषासुराने थैमान घातले . साधुसंत , हृषीमुनी त्रस्त झाले , ब्रम्हा , विष्णू , महेश या देवतांनी आदिमातेला पार्वतीला साकडे घातले . तिने अवतार घेऊन दैत्याचा नाश केला – आणि कृष्णाकाठ निर्भय केला.  कृष्णेची आणि पार्वतीची भेट झाली.  कृष्णेने इच्छा व्यक्त केली  –  तू आता इथे माझ्या सन्निधच रहा.  कृष्णेच्या इच्छॆसाठी-आदिशक्ती पार्वतीने येथेच वास्तव्य केले . तीच ही जगन्माता श्री भुवनेश्वरी .

श्री दत्तावतारांच्या किंवा दत्तयोग्यांच्या लोकोत्तर,  परमपावन जीवन-गंगेचा उगम थेट प्राचीनतर काळापर्यंत जावून भिडतो.  मूळ दत्तावताराच्या गंगोत्रीतून उगम पावलेली दत्तावतारी युगपुरुषांची ही जान्हवी  –  धारा मानवतेच्या महासागरात एकरूप होण्यासाठी या पुण्यभूमीत  –  या भरतखंडात अखंड वाहत आहे.

भगवान दत्तात्रेय , श्रीपादश्रीवल्लभ , श्री नरसिंहसरस्वती, श्री अक्कलकोटचे स्वामी समर्थ, माणिकप्रभू , वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज, मौनी स्वामी , अवधूतस्वामी ( श्री शंकरानंद) अशी ही उत्तुंग , दिव्या परंपरा, अशा या तेजोराशीतील एका तेजोमणी म्हणजे सदगुरु – नारायणानंदतीर्थ स्वामी !

छायाचित्र दालन

श्री क्षेत्र औदुंबर
श्री गुरु शिवशंकरानंद – दत्त मंदिर
आदिशक्ति भुवनेश्वरी मातेचे मंदिर
दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी
श्री ब्रम्हानंद मठ