स्वामी महाराज यांचे संक्षिप्त महात्म्य

‘वन्दे कारुण्यजलधिं  दंड व्याख्याकरं यतिम् । 
  नारायणानंदतीर्थ श्री गुरुं भक्तवत्सलम् ॥

श्रीगुरुचे महत्व –

जगात असलेल्या यच्चयावतसर्व पदार्थात ज्ञान ही चीज़ महत्तम आहे.  ज्ञानशक्तिमुळ॓  मानवाने  निरनिराळ्या वस्तूंचे शोध लावले¸ आणि त्यामुळेच तो सुख-समाधानाच्या मार्गाचे आक्रमण करीत आहे.  सामान्यत: जन्मत:च ज्ञानाचा ठेवा लाभत नसतो.  तो मिळवावा लागतो. केवळ स्वत:च्या प्रयत्नाने ज्ञानाचा लाभ होत नाही¸  तर त्यासाठी मार्गदर्शक आवश्यक  आहे.  व्यावहारिक कार्यकारणभावाचा विचार अनुभवाने होऊ शकतो.  तथापि या व्यावहारिक अनुभवाची पात्रता येण्यास मार्गदर्शनाची आवश्यकता पदोपदी भासते. “चक्षुर्वै सत्यम” असलेल्या गोष्टीविषयीसुद्धा मार्गदर्शकाची – गुरुची अपेक्षा आहे¸ तर या जगाच्या बुडाशी असणारी जी अलौकिक शक्ति – ईश्वर व त्याच्या सम्बंधिचे ज्ञान या लौकिक अनुभवाच्या टप्प्यात नसणा-या गोष्टीविषयी ज्ञाता मर्गदार्शकाची –  सदगुरुची नितांत गरज आहे.  याविषयी मुळीच दुमत संभवत नाही.  याप्रमाणे मार्गदर्शन करणाऱ्या गुरुंचे महत्व जगातील इतर सर्व व्यक्तिपेक्षा अनन्यसाधारण आहे. त्यामुळ॓च म्हंटले आहे “नास्ति तत्त्वं गुरो: परम्” गुरुपेक्षा श्रेष्ठ तत्त्व नाही.

सुखासाठी प्राणीमात्रांची सारखी धडपड चालली आहे. खरे सुख धर्माशिवाय प्राप्त होत नाही. याविषयी असे म्हटले आहे – ” सुखार्था सर्वभूतानां मता: सर्वा: प्रवृत्तय:। सुखंच न विना धर्मात्तस्माद्धर्मपरो भवेत् ॥ अर्थात धर्मास अनुसरून प्रयत्न केला पाहिजे.

ईश्वरी अनुग्रह असल्याशिवाय प्रयत्नाला यश येत नाही.  ईश्वर प्रसन्न होण्यासाठी उपासना आवश्यक आहे. उपासनेचा मार्ग दाखविणारे सदगुरु होत.

दुष्ट प्रवृतिंचा नाश, साधुंचे रक्षण आणि धर्माची जागृति यासाठी ईश्वर अवतार घेतो.

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥

अशी भगवंताची प्रतिज्ञा आहे.  दृष्टांचा नाश करण्यासाठी झालेले भगवंताचे अवतार ती कार्ये झाल्यानंतर समाप्त झाले. उदा. श्रीराम, श्रीकृष्ण, इत्यादि परंतु धर्मं रक्षण – ईश्वरी अनुग्रहाचे साधन असलेला जो उपासना मार्ग त्याचे सातत्य राखण्यासाठी झालेला भगवंताचा श्री गुरुस्वरूप अवतार श्री दत्तात्रय हा चिरंतन आहे.  माहुरगढ़ी निंद्रा, काशी क्षेत्री स्नान, करहाटक क्षेत्रात संध्या, कोल्हापुरी भिक्षा, पांचाल क्षेत्री भोजन असा श्री दत्तगुरूंचा नित्यक्रम अव्याहत चालु असल्याचे वर्णन आहे.  अधिकारी भक्तांना त्यांचे दर्शन झाल्याच्या कथा आहेत.  ज्यांचा अधिकार मंद आहे आशा भक्तांना उपासनेचे मार्गदर्शन करण्यासाठी दत्तगुरुंचे निरनिराळ॓ अवतार झाले.  त्यात श्री नृसिंहसरस्वती ही अवतार विभूति श्रेष्ट आहे. यांचेच चरित्र, सुप्रसिद्ध आशा श्री गुरुचरित्र ग्रंथामधे आहे. विदर्भात कारंजा या गावी जन्म, काशिस बालवयात संन्यास, त्यानंतर परळी वैजनाथ, औदुंबर, वाडी, व गाणगापुर या क्षेत्रात क्रमाने वास्तव्य या त्यांच्या चरित्रातील गोष्टी प्रसिद्ध आहेत.  श्री नृसिंहसरस्वती यांचे वास्तव्य औदुंबर क्षेत्री  (  जिल्हा सांगली )  एक चातुर्मास होते.  तेथील चरित्र श्रीगुरु चरित्राच्या १७ व्या अध्यायात आहे.  औदुंबरी असलेल्या कृष्णा नदीच्या पैलतीरावर भुवनेश्वरी देवीचे पुरातन मंदिर आहे.  तेथे कोल्हापुरचा एक अतिशय मंदबुद्धीचा तरुण ब्राम्हण लोकनिंद॓स कंटाळून तपश्चर्येस आला.  अधिक तपश्चर्या केली तरी देवी प्रसन्न न झाल्यामुळ॓ जिव्हा छ॓दून देवीला अर्पण केली.  त्या बरोबर देवी प्रसन्न होऊंन त्याला औदुंबरी श्री गुरुंकडे पाठविले.  हया विषयी प्रासादिक गुरु चरित्रात असा उल्लेख आहे की,

औदुंबराचे वृक्षातळी असे तापसी महाबळी।
अवतार पुरुष चंद्रमौळी तुझी वांच्छा पूरवील ॥

श्री गुरुकृपेमुळ॓ तो विप्रकुमार विद्वान झाला असे थोडक्यात ते चरित्र आहे.  या औदुंबरक्षेत्री दत्तात्रयांचे साक्षात् शिष्य परंपरेतील जनार्दन स्वामीना येथेच दर्शन झाले,  असे त्यांचे अभंगवाणीने स्पष्ट केले आहे. तसेच हे अनेक साधू , संत, सत्पुरुष येउन तपश्चर्या केलेले ठिकाण आहे व अनेक साधू-संत येथे येऊंन रहात आहेत.  अशा भक्त रत्नमालिकेत अतिशय तेजस्वी रत्न म्हणजेच श्री गुरु नारायणानंदतीर्थ स्वामी महाराज होत.

या सदगुरुंच॓ दर्शन म्हणजे विशाल अणि अथांग अशा महासागराचे दर्शन. त्यांचे मधुर, मृदुल शब्द म्हणजे अमृतबिन्दु . ते कधी महातेजस्वी सूर्याप्रमाणे दिसत – तर कधी सुंदराचा स्वामी जो चन्द्रमा त्याच्या प्रमाणे शांत, शीतल, प्रसन्न, ते कधी पीत्या प्रमाणे धीर देत तर कधी माऊली प्रमाणे मायेची बालवाटी भरवित.  आपण सदगुरु्वामींचे शिष्य, भक्त म्हणजे त्यांची मुलेच. आपण किती भाग्यवान ? अशा या प्रशांत कल्पदृमातळी आपण निवांतपणे कैवल्यसुखे उपभोगीत आहोत.  माउलीच्या पदराखाली विसावलो आहोत. निश्चिंत आहोत. या कल्पदृमाच्या छायेत आहोत म्हणजे आपण आपले नाहीच. आपण सदगुरुंच॓च आहोत.

‘ सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी ‘ असे श्री संत एकनाथ महाराजांनी सांगितले आहे.  कारण अलौकिक सत्पुरुषांचे व संतांचे जीवन मोठे श्रेष्ट व दिव्य असते.  त्यांच्या जीवन चरित्रापासून आनंद मिळतो,  स्पूर्ति घेता येते व आदर्श डोळ्यापुढे ठेवता येतो.  व्यक्ति मानवाच्या मनावर प्रभावी संस्कार करण्याचे व मनुष्यमात्राला मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य अशा संपन्न जीवनात काठोकाठ भरलेले असते.

महर्षि नारदांनी सांगितल्या प्रमाणे “तत्प्राप्य तदेवावलोकयति तदेव श्रुणोति तदेव चिंतयति”  म्हणजे आपल्या परमप्रिय सदगुरुंचे प्रेमस्वरूप प्राप्त झाल्यावर भक्त तेच पाहतो¸  तेच ऐकतो व त्याचेच चिंतन करीत राहतो.  एवढेच नव्हे तर असे हे कार्य म्हणजे भक्तांनी एकमेकांशी केलेला सुखसंवादच होय.

महर्षि नारदांनी या अश्या कार्याचे महात्म्य सांगताना म्हंटले आहे की,  ‘कंठावरोधरोमांचाश्रुभि: परस्परं लपमाना: पावयंती कुलानि पृथिवींच’ असे अनन्य भक्त एकमेकांशी संभाषण करताना त्यांचे ठिकाणी अष्ट सात्विक भाव उत्पन्न होऊन त्यांचा कंठ सद् गदित होतो. अंगावर रोमांच उभे राहतात. नेत्रातुन प्रेमाश्रु वाहू लागतात आणि अश्या त्यांच्या प्रेम संवादामध्ये सर्व कुले आणि पृथ्वी पावन होऊन जाते.

श्री स्वामी नारायणानंद उच्चकोटीचे भक्त,  प्रेमी संत व सर्वोपकारी संन्यासी होते.  आपल्या तप सामर्थ्याने त्यांनी असंख्याना दुःख मुक्त केले.  असंख्यांचा उद्धार केला. त्यांचेकडे पाहिले की – दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती पुन्हा अवतरले आहेत असे वाटे.

त्यांची तपश्चर्या इतकी अलौकिक होती की ते समाधिस्थ झाल्यावर एका दिव्य दृष्टीच्या मुलाने असे उदगार काढले की “स्वामी सूर्य मंडळ भेदून गेले”.

छायाचित्र दालन

श्री क्षेत्र औदुंबर
श्री गुरु शिवशंकरानंद – दत्त मंदिर
आदिशक्ति भुवनेश्वरी मातेचे मंदिर
दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी
श्री ब्रम्हानंद मठ